निलंगा : प्रतिनिधी
कासारसिरसीच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीत कासारसिरसी विकासाच्या नकाशावर आले असून तालुका निर्मितीच्या अगोदरच अपर तहसील कार्यालयासह अन्य कार्यालये उभारले जात असून येणा-या दोन वर्षांत एका प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सर्वच कार्यालये उभारले जातील महाराष्ट्रात जेव्हा नवीन तालुका निर्मिती केली जाईल तेव्हा अग्रस्थानी कासारसिरसी व किल्लारी तालुक्याची निर्मिती होईल, अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
कासारसिरसी येथील ४० कोटींच्या कासारसिरसी अपर तहसील कार्यालय व महसूल कर्मचारी निवासस्थाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डि. बी. निळकंट, उपअभियंता बांधकाम अनिता पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, अभियंता किरण पाटील, ए एम मुळजकर, सरपंच मोनाली ज्ञानेश्वर मडूळे, उपसरपंच विरेशचिंंचसुरे, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, महिला अध्यक्षा कविता गोरे, उपअभियंता लदाफ शकील हे उपस्थित होते. आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की कासारसिरसीच्या विकासामध्ये अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण मात्र सामान्यांचे आमदार आहोत याची जाणीव ठेवून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कासारसिरसीच्या विकासासाठी कोट्यवधींंचा निधी उपलब्ध करून कासारसिरसीचा कायापालट करण्याचे काम केले. या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री व प्रशासकीय अधिका-यांची मोलाची मदत झाली.
येणा-या काळातही कासारसिरसी विकासाची जबाबदारी माझी आहे. मागच्या काळात राज्य कर्त्यानी दुर्लक्ष केल्याने या भागातील विकासाचा अनुशेष निर्माण झाला आहे मात्र आता शासनाच्या तिजोरीतून येणारा पहिला घास या भागातील विकासाला देण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होत असून कासारसिरसी पाणीपुरवठा योजना, कोकळगाव बॅरेज, कासारसिरसी- कोराळी रस्ता आदी कामे मार्गी लागली आहेत, असे ते म्हणाले.