19.5 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसंपादकीयअफवेचे बळी

अफवेचे बळी

वाईट बघू नका, वाईट चिंतू नका, वाईट बोलू नका असे कितीही घसा फोडून सांगितले तरी अनेकवेळा तसेच वागण्याचा मनुष्यस्वभाव आहे. अशा स्वभावामुळे त्या व्यक्तीचे नुकसान तर होतेच शिवाय तो अनेकांच्या नुकसानाला कारणीभूत ठरतो. याचे प्रत्यंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव जिल्ह्यातील माहेजी ते परधाडे स्थानकादरम्यान आले. या स्थानकांदरम्यान लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरून प्रवाशांनी साखळी ओढत गाडी थांबवून उड्या मारल्या. त्याचवेळी भुसावळकडे जाणा-या कर्नाटक एक्स्प्रेसखाली अनेक प्रवासी चिरडले गेले. त्यापैकी १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ४० हून अधिक जखमी झाले. पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास भुसावळहून मुंबईकडे रवाना झाली. पाचोरा तालुक्यातील माहेजी-परधाडे स्थानकादरम्यान गाडी आली असता पावणेपाचच्या सुमारास इंजिनलगतच्या द्वितीय श्रेणीतील डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी गाडी थांबवली आणि डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी बंगळुरूहून दिल्लीकडे जाणा-या कर्नाटक एक्स्प्रेसने रुळावर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. आपत्कालीन साखळी ओढली गेल्याने चालकाने ब्रेक लावले.

ब्रेक लावल्याने चाके रुळावर घासली जाऊन ठिणग्या उडाल्या. गाडीतील प्रवाशांनी ते पाहिले आणि आग लागल्याची अफवा पसरली. काही घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतून दोन्ही बाजूंनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी बंगळुरूहून येणा-या कर्नाटक एक्स्प्रेसखाली हे प्रवासी चिरडले गेले. अपघातानंतर रेल्वे ट्रॅकवर सर्वत्र मृतदेह व मानवी शरीराचे तुटलेले अवयव दिसून येत होते. पुष्पक एक्स्प्रेस थांबल्यानंतर साखळी का ओढली याची तपासणी सुरू होती. यावेळी काही प्रवासी गाडीतून उतरत होते. तपासणी होत असताना चालकाने नियमानुसार फ्लॅशर लाईट ऑन केला होता. दुस-या बाजूने येणा-या कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने तो लाईट पाहिला होता आणि त्याने ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते. घटनास्थळावर वळण असल्याने दृश्यता आणि ब्रेकिंगसाठीचे अंतर कमी होते. दोन्ही चालकांनी अपघात रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले परंतु दुर्दैवी घटना घडलीच.

रेल्वेच्या एकाच डब्यातील लोकांनी उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कानावर पडलेल्या शब्दांची खात्री न करता प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी घाईघाईने रेल्वेतून उड्या मारल्या आणि नाहक जीव गमावला. एका अफवेने घात केला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. कर्नाटक एक्स्प्रेसने रुळावर प्रवासी दिसत असतानाही हॉर्न वाजवला नाही असे काहींचे म्हणणे आहे. हॉर्न वाजवला असता तर रुळावर थांबलेले प्रवासी सावध होऊन वाचले असते असेही म्हटले जाते. परंतु या जर-तरच्या गोष्टी झाल्या. रेल्वे दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आधीच रेल्वे रुळावरून घसरणे, दोन गाड्यांची चुकीने समोरासमोर टक्कर होणे, गाडीच्या एखाद्या डब्याला आग लागणे यासारख्या घटना घडून अनेकांचे प्राण गेले आहेत.

त्यात आता गाडीच्या डब्याखाली आग लागल्याची अफवा पसरून मोठी दुर्घटना घडावी हे दुर्दैवीच. वाईट याचे वाटते की, कोणतीही शहानिशा न करता, स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी डोळे झाकून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. शेवटी जे व्हायचे तेच झाले. कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर अनेकांचे प्राण वाचले असते असे म्हटले जाते परंतु या जर-तर च्या गोष्टी झाल्या. आता रेल्वे व राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना कितीही आर्थिक मदत जाहीर केली तरी गेलेले प्राण परत येणार नाहीत. यातून धडा काय तर, जनतेने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता चुकीचे निर्णय घेणे म्हणजे स्वत:हून संकटास आमंत्रण देण्यासारखे आहे. आगीच्या खोट्या अफवेने भीतीपोटी सुरक्षित राहण्याऐवजी जीव द्यावा लागला ही दु:खदायक घटना आहे. देशात सर्वाधिक केला जाणारा रेल्वेप्रवास असा धोकादायक ठरावा याचे वाईट वाटते.

कुठलीही रेल्वे, विशेषत: लांब पल्ल्याची रेल्वे थांबली की त्यातील प्रवासी अस्वस्थ होतात, त्यातच आगीची अफवा पसरली की जीव वाचवण्यासाठी प्रवासी रेल्वेतून खाली उतरतात. त्यामुळे अशा प्रकारे रेल्वे थांबली की ती का थांबली ते प्रवाशांना कळावे म्हणून डब्यामध्ये स्पीकर यंत्रणा असावी. ज्यामुळे प्रवाशांना माहिती दिली जाऊ शकेल. लोकल ट्रेनमध्ये अशी व्यवस्था असते. एकूणच प्रवास कुठलाही असो प्रवाशांनी सावध व सतर्क राहणे अत्यावश्यक झाले आहे. एखादी अफवा लोकांचे कसे हकनाक बळी घेते ते जळगाव जवळच्या रेल्वे अपघातात दिसून आले. चुकीची किंवा अर्धवट माहिती किती भयंकररीत्या किंमत मोजायला लावते हेही या घटनेवरून सिद्ध झाले. या निमित्ताने प्रवासादरम्यान घ्यायची काळजी किंवा एखाद्या आणीबाणीप्रसंगी नेमकी काय कृती केली पाहिजे याची देखील जनजागृती करण्याची वेळ आली आहे.

प्रवास लांबचा असो की जवळचा तो सुरक्षितपणेच झाला पाहिजे. ही सुरक्षितता तितक्याच सावधपणे बाळगण्याचे काम प्रवाशांना करावे लागेल. तरच अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येऊ शकतील. गत पाच वर्षांपासून रेल्वेने आपल्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत, नवीन राजधानी यासारख्या ब-याच आधुनिक सुविधा असलेल्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु सध्याचे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेता, रेल्वेचा जसा एक गार्ड असतो त्याप्रमाणे सुरक्षिततेसाठी संरक्षक पथक तैनात करण्याची गरज आहे. तेजस किंवा वंदे भारत या गाड्यांचे भाडे सामान्य गाड्यांपेक्षा दुप्पट असते. सर्वसामान्याला ते परवडणारे नाही. या नव्या गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात सूचना देता येईल अशी ध्वनी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

तशी यंत्रणा आता सर्वच गाड्यांमध्ये बसवली गेली पाहिजे. सध्याचा जमाना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आहे. सीसीटीव्ही आणि अन्य माध्यमातून गाडी कुठल्या मार्गाने जात आहे, समोरून कोणती ट्रेन येणार आहे हे छोट्या स्क्रीनवरून दाखवता येऊ शकते. गाडीच्या कोणत्या भागात तांत्रिक बिघाड झाला आहे हे सुद्धा प्रवाशांना सविस्तरपणे सांगता येऊ शकते. परंतु सामान्य माणसाला परवडणा-या पॅसेंजर अथवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीही सुविधा नाही. अशा असुविधांमुळेच सर्वसामान्यांचे मरण स्वस्त ठरते. रस्ते अपघात असो, रेल्वे अपघात असो, उत्सव-यात्रा यामध्ये होणारी चेंगराचेंगरी असो त्यात सर्वसामान्यांचेच बळी जातात. म्हणून म्हणायचे- मरण स्वस्त झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR