25.4 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांकडून बेकायदा जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

अब्दुल सत्तारांकडून बेकायदा जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सिल्लोड येथील सर्व्हे नंबर ३७७ मध्ये पठाण परिवाराची वडिलोपार्जित २ एकर ३४ गुंठे जमीन शिल्लक आहे. या जमिनीवर अब्दुल सत्तार हे कायदेशीर परवानगी नसताना निवडणूक प्रचार कार्यालय थाटून सत्तार पठाण कुटुंबीयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथे उभारलेला मंडप बेकायदेशीर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पठाण परिवाराने केली आहे.

या प्रकरणात त्यांचा कायदेशीर प्रशासकीय व न्यायालयीन लढा सध्या सुरू असून, विविध ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या जमिनीवर मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय दुर्गा नवरात्र उत्सव’ साजरा करण्यासाठी तात्पुरती परवानगी काढून तिथे नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी भव्य मोठे मंडप शेड उभारले होते. त्यामुळे पठाण परिवाराने त्याबाबत २ ऑक्टोबर रोजी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी कारवाई न केल्यामुळे पठाण परिवार ७ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.

हे उपोषण तब्बल १० दिवस सुरू होते, शेवटी पोलिसांनी पठाण परिवारास आश्वासन दिले होते की, नवरात्र उत्सव संपल्यानंतर तेथील मंडप/शेड काढण्यात येईल, कारण दिलेली परवानगी ही तात्पुरती स्वरूपाची आहे. त्यामुळे पठाण परिवाराने उपोषण स्थगित केले होते.

परंतु, नवरात्र उत्सव संपूनदेखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंडप व शेड काढले नाही. या प्रकरणाची दखल घेऊन तालुका दंडाधिकारी सिल्लोड यांनी पोलिस निरीक्षकांना २६ ऑक्टोबर रोजी कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते. पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन कसलीच कारवाई करत नसल्यामुळे पठाण परिवाराने ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या जागेवर जाऊन साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाला. या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. पठाण परिवार व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR