मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. अशातच मराठी कलाकार प्राजक्ता माळीसाठी मनसेने धाव घेतली असून भाजप आमदार सुरेश धस यांनी इशारा दिला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमेय खोपकर यांनी तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. त्यानंतर आता संतप्त प्राजक्ता माळीने सुरेश धस यांची महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर पोस्ट करत भाजप आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. त्यानुसार, सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारे आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना इशारा दिला आहे.