मुंबई : सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असतानाच कॉंग्रेसचे माजी आमदार अमर काळे आणि नितेश कराळे मास्तरांनी आज पक्षप्रवेश केला. त्यामुळे काळे, कराळे यांच्यापैकी कोणाला लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नितेश कराळे म्हणाले की, मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्वर ओक येथे प्रवेश घेतला. लवकरच मी माझी भूमिका आणि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे. पवार साहेब व जयंत पाटील साहेब यांच्या प्रचंड आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील वाटचालीची सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे. केंद्रात सत्तेत असलेले मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे, असे ते म्हणाले.
सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे. तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवेल आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्यूब, फेसबुक, आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांडत राहील. हे मा. पवार साहेबांशी बोलूनच मी माझा प्रवेश पक्षात घेतला, असेही ते म्हणाले.