मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुदृढ बनत चाललेल्या अमेरिकी डॉलरपुढे रुपया पूर्णपणे नतमस्तक झाला असून, सोमवार, दि. २ डिसेंबर २०२४ रोजी त्याने १२ पैशांच्या घसरÞणीसह प्रतिडॉलर ८४.७२ या नवीन नीचांकाला गाठले.
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिर्क्स देशांच्या स्वतंत्र चलनाच्या योजनेबाबत दिलेल्या कठोर इशा-याच्या पार्श्वभूमीवर सर्वच आशियाई चलनांनी डॉलरपुढे नांगी टाकली. बरोबरीने देशांतर्गत घसरलेल्या जीडीपीची आकडेवारी आणि उत्पादन क्षेत्राचे मंदावलेपण या गोष्टीही चलन बाजारातील व्यवहारांवर नकारात्मक प्रभाव पाडणा-या ठरल्या. त्यामुळे आंतरबँक चलन व्यवहारात ८४.५९ या पातळीवर खुले झालेल्या रुपयांच्या व्यवहारांनी ८४.७३ च्या नीचांकापर्यंत वळण घेतले. शुक्रवारच्या सत्रातही रुपयाचे मूल्य १३ पैशांच्या घसरणीसह ८४.६० या डॉलरपुढील नव्या सार्वकालिक तळापर्यंत ढासळले होते.
दुसरीकडे जीडीपी घसरण, ट्रम्प यांच्या धमक्यांना दुर्लक्षित करून सोमवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह स्थिरावले. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक या ब्लू-चिप समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे वरील प्रतिकूल घटकांकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. शुक्रवार आणि सोमवारच्या सत्रात मिळून रुपया तब्बल २५ पैशांनी गडगडला, त्या उलट सेन्सेक्स याच दोन दिवसांत तब्बल १,२०० हून अधिक अंशांनी वधारला आहे.