ट्रम्प यांची घोषणा, पाकिस्तानचा जळफळाट
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका दौ-यात गुरुवारी रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ४ तास बैठक झाली. या बैठकीनंतर वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदन जारी केले. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला जगातील सर्वांत घातक फायटर विमान एफ-३५ स्टील्थ फायटर जेटचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता पाकचा जळफळाट सुरू झाला असून, यामुळे दक्षिण आशियात सैन्य संतुलन बिघडेल, अशी भीती व्यक्त केली. यावेळी पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा मुद्दाही प्रकर्षाने मांडला गेला.
याबाबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी अमेरिका आणि भारताचे हे विधान केवळ एकतर्फी नाही तर दिशाभूल करणारे आहे. पाकिस्तानने केलेल्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु भारताचा दहशतवादाला असलेला पाठिंबा अशा गोष्टींमधून लपवता येणार नाही, असे म्हटले. तसेच अमेरिकेने भारताला एफ-३५ फायटर जेटचा पुरवठा करणार असल्याच्या निर्णयावर यातून दक्षिण आशियात सैन्य संतुलन बिघडेल आणि स्थैर्य संपेल, अशी भीती व्यक्त केली. तसेच हा निर्णय एकांगी, कुटनितीक नियमविरोधी आहे, असेही म्हटले.
भारत रशिया, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांकडून सर्वांत जास्त शस्त्रास्त्र खरेदी करतो. त्यात रशिया आणि फ्रान्स या दोन देशांशी भारताचे जुने संरक्षण संबंध आहेत. आता अमेरिकेने भारताला एफ-३५ देण्याची तयारी दाखवली आहे. एफ-३५ सध्याच्या घडीला जगातील सर्वांत घातक फायटर विमान आहे. हे पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर विमान आहे. रडारलासुद्धा हे विमान सापडत नाही. अत्यंत अचूक वार करण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे.
ट्रम्प यांचा पाकला इशारा
या वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने भारतासोबत अब्जावधी डॉलर्सची लष्करी खरेदी वाढवली आहे. जगासाठी धोकादायक बनलेल्या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत पूर्वीप्रमाणेच एकत्र काम करत राहतील, असे सांगत पाकला इशारा दिला. एवढेच नव्हे, तर दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये, असेही बजावले.
राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली. तसेच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बेकायदेशीर वास्तव्य करणा-या नागरिकांच्या मुद्यावर मोदी यांनी हा जागतिक प्रश्न बनला असल्याचे म्हटले.
द्विपक्षीय व्यापाराला चालना
भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी मिशन ५०० ची घोषणा केली. त्याचा भारतावर मोठा परिणाम होणार असून येत्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. मोदी-ट्रम्प यांच्या बैठकीत एफ-३५ लढाऊ विमानाच्या विक्रीसह भारतासोबत १० वर्षांसाठी संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली. तसेच व्यापारी संबंधावर जोर देण्याचे ठरले.