लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या भाजपा पदाधिकारी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय अरविंद खोपे या मुलाचा संस्थेच्या वस्तीगृहात संशयास्पद मृत्यूच्या घटनेत नवीन माहीती समोर येत असून अरविंद खोपेच्या मृतदेहावर एक- दोन नाही तर तब्बल नऊ जखमा आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
जेएसपीएम संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. मुलाचा खुन करण्यात आल्याचा आरोप चिमुकल्या अरविंदच्या पालक व नातेवाईकांडून केला जात आहे.
परंतु शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की, मृत अरविंद खोपेच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. म्हणजेच तब्बल नऊ जखमा आहेत. दुखापती क्रमांक १ ते ४ ते ९ ताज्या जखमा असल्याची नोंद आहे. दुखापत क्रमांक ३ ही सुमारे ३ ते ७ दिवसांची आहे. तर डॉक्टरांच्या मतानुसार हा मृत्यू मानेच्या आकुंचनमुळे झाला आहे. जर असे असेल तर मयत अरविंद खोपेच्या शरिरावरील त्या जखमा कशाच्या? केल्या कोणी? मानेचे अंकुचन झाले कसे ?, याचा छडा का लावला जात नाही, असा सवाल मयत अरविंदच्या नातलगांकडून ंकेला जात आहे.