28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसंपादकीय विशेषअरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा ?

अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा ?

2०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारविरोधात भाजपाने आक्रमक प्रचार केला. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कारभारावर आरोप व टीकेचा भडिमार करताना ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असा सवाल केला जात होता. आज त्याच भाजपाला या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पूर्वी एखादी हिंसक घटना झाली तर महाराष्ट्राचा बिहार होतोय, अशी टीका केली जायची. पण अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या घटना बिहारलाही मागे टाकणा-या आहेत. विकोपाला गेलेल्या संघर्षामुळे राजकीय नेत्यांची भाषा गल्लीतल्या मवाल्यांनाही लाजवणारी आहे. कोण किती खालच्या पातळीवर जातो याची स्पर्धा सुरू आहे. स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेणा-या लोकांचाही तोल गेला आहे. शाहू, फुल्यांच्या विचारांचा वारसा असणा-या महाराष्ट्रात नेतेमंडळी वापरत असलेली फुल्याफुल्यांची भाषा सर्वांनाच खाली मान घालायला लावणारी आहे. ज्यांनी बेताल लोकांना आवरणे अपेक्षित आहे त्याच मंडळीचा तोल सुटल्याने पुढच्या काळात काय काय ऐकायला व बघायला मिळेल याचा भरवसा राहिलेला नाही. महाराष्ट्रात आजवरच्या सर्व निवडणुका शांततेत झाल्या आहेत. पण सध्याचे वातावरण बघितले तर यावेळी राजकीय संघर्ष वेगळ्या वळणावर जाण्याची भीती व्यक्त होते आहे.

मागच्या आठवड्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार करून खळबळ उडवून दिली होती. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्षातल्या या ‘गँगवॉर’मुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात असताना. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. या सगळ्या प्रकाराचे त्याने थेट फेसबुक लाईव्हद्वारे प्रक्षेपण केले. यावरून खळबळ उडालेली असताना, पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि विधिज्ञ असीम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही गुंडांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने आधीच आरोप होत असताना, या घटनांनी सरकारच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तसे काहीही होणार नाही हे सर्वांनाच माहीत असले तरी सरकारविरोधात काहूर उभे करण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे भर घातली आहे. विरोधकांनी घोसाळकर हत्या प्रकरणानंतर आपल्या राजीनाम्याची मागणी केली असल्याबद्दल विचारता, गाडीखाली श्वान आला म्हणून सुद्धा ते माझा राजीनामा मागतील, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. एका तरुण नेत्याची हत्या झालीय, आपणही विरोधी पक्षात असतो तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, याची जाणीव ठेवून बोलणे अपेक्षित असताना, गाडीखाली आलेल्या कुत्र्याचे उदाहरण देऊन त्यांनी स्वत:च्याच प्रतिमेला तडा दिला आहे.

उलट्या पायाची शर्यत !
फडणवीस यांनी गाडीखाली आलेल्या कुत्र्याचे उदाहरण देताच ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना मनोरुग्ण ठरवले, तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे निदान केले. भाजपा आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊत यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची जबाबदरी पक्षाने सोपवलेली असल्याने त्यांनी राऊत यांना त्याच शिवराळ भाषेत ‘रिटर्न गिफ्ट’ दिले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार,भाजपाचे गोपीचंद पडळकर, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिभेला नेहमीच बहर येत असतो. ज्या शब्दात टीका होईल, त्याच शब्दात उत्तर देण्याच्या भूमिकेमुळे सुरू झालेली उलट्या पायाची शर्यत थांबण्याची काहीही चिन्हं नाहीत. यात नेतेमंडळी सहभागी असल्याने कोण कोणाला थांबवणार हा प्रश्नच आहे.

आयोगाचा अपेक्षित निर्णय !
शिवसेनेप्रमाणेच विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेत निवडणूक आयोगाने मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व पक्षाचे घड्याळ हे अधिकृत चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. हा निर्णय सर्वांनाच अपेक्षित होता. हा निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोग कशाचा आधार घेणार एवढेच कुतुहल होते. राष्ट्रवादीची घटना, कागदपत्रं व्यवस्थित होती. पण शरद पवार यांच्यासह पक्ष पदाधिका-यांची निवड घटनेप्रमाणे झालेली नसल्याचे सांगून आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेतला.

हा निर्णय अनपेक्षित नसला तरी येणा-या निवडणुकीत नवे नाव व चिन्ह घेऊन लोकांसमोर जाण्याचे आव्हान शरद पवार यांच्यासमोर असणार आहे. शरद पवार यांना अर्थातच याचा अनुभव आहे. १९९९ साली जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ते निवडणुकीला सामोरे गेले होते. दुस-या क्रमांकाचा पक्ष होऊन राज्यात आघाडी सरकारही स्थापन केले होते. तेव्हापेक्षा आताची परिस्थिती अधिक सोपी आहे. सोशल मीडियाचा प्रसार झालाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. चिन्ह लोकांपर्यंत पोचवायला फार वेळ लागणार नाही. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याचा विस्तार केला, त्यांनाच त्या पक्षातून बेदखल करण्याचा निर्णय लोकांना फारसा रुचलेला दिसत नाही. त्यामुळे चिन्ह जाण्यामुळे होणा-या तोट्यापेक्षा ते गेल्यामुळे मिळणारी सहानुभूती मोठी ठरणार का? हाच कळीचा प्रश्न असणार आहे. या आठवड्यात राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येणार आहे. त्यांचा निर्णयही शिवसेनेपेक्षा फार वेगळा असेल असे समजण्याचे कारण नाही.

देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीचाही रामराम!
मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसची साथ सोडली असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी अजून काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांनी आपला प्रवास त्याच दिशेने होणार असल्याचे स्पष्ट केलेय. दोन पक्ष फोडून सोबत घेतले असले तरी महाराष्ट्रात, मुंबईत अजूनही परिस्थिती म्हणावी तेवढी बदललेली नाही याची जाणीव भाजपाला आहे. त्यामुळे मिळतील तेवढी माणसं गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांना भाजपात घेण्याची अडचण आहे किंवा ज्यांना स्थानिक समीकरणांमध्ये भाजपात थेट जाणे परवडणारे नाही, अशा लोकांसाठी महायुतीतील दोन पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत.

मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय निवडला, तर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईत अजितदादांकडे कोणीही मोठा नेता नव्हता. नवाब मलिक यांना लोकांसमोर आण्ण्याला भाजपाचा विरोध आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या रूपाने त्यांना एक चेहरा मिळाला आहे. झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. तर मिलिंद देवरा यांचा दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याकडेच कायम राहणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे देवरा किंवा सिद्दीकी यांनी नवीन पक्ष शोधले हे उघड आहे. आघाडीत तिसरा भिडू आल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी असे प्रकार दिसणार आहेत.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR