29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रअर्धा यूपी आपल्याकडे पोट भरायला येतो...

अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरायला येतो…

पिंपरी : प्रतिनिधी
ज्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो, ते भोसरी मतदारसंघात येऊन म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’ समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या द-याखो-यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे तो और लढेंगे’ आणि ‘जुडेंगे और जितेंगे’हे चालते. त्यामुळे सुसंस्कृत उमेदवार अजित गव्हाणे यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सभेत केले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ टाळगाव चिखली येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी कोल्हे बोलत होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, लोकसभेला मतांची कडकी बसल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. मग बहिणींना १५०० रुपये देण्यास सुरुवात केली; पण २०१४ ला १५ लाख रुपये देण्याची केलेली भाषा १५०० रुपयांवर कधी आली, हे जनतेला समजले नाही.

एका हाताने लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैसे देतात आणि दुस-या हाताने काढून घेतात. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी यांचे नेते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळावा म्हणत होते. आज पेट्रोल, डिझेल, गोडेतेल, डाळी, कडधान्य सर्व महाग झाले आहे; मात्र सोयाबीन साडेचार हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांवर आले आहे. राज्यातील दोन पक्ष यांनी विकासासाठी फोडले, मात्र विकास झाला नाही. विकास झाला असता तर राज्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या नसत्या. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सुसंस्कृत उमेदवारांमागे उभे रहा.

म्हणून मी लढण्यासाठी उभा राहिलो
अजित गव्हाणे म्हणाले की, भोसरी मतदारसंघातील नागरिकांनी गेली दहा वर्षे खूप भोगले आहे. त्यामुळे आता परिवर्तन करण्याची गरज आहे. ज्यावेळी आपण एखादा लोकप्रतिनिधी निवडतो, त्यावेळी आपल्याला त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा असते; मात्र आपला भ्रमनिरास झाला म्हणून मी निवडणूक लढवण्यासाठी उभा राहिलो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR