लंडन : वृत्तसंस्था
आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला विम्बल्डनच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. २१ वर्षीय कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत ग्रँडस्लॅम जिंकली. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विम्बल्डन चॅम्पियनशीप २०२४ वर नाव कोरले. रविवारी (१४ जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल स्थानावर असणा-या कार्लोस अल्काराझने अनुभवी नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. ३ सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात कार्लोसने विजय मिळवला. लंडनच्या सेंटर कोर्टवर हा सामना रंगला.
विम्बल्डन चषकात यंदा सलग दुस-यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसने जोकोविचला ६-२, ६-२, ७-५ ने पराभव केला. केवळ २१ व्या वर्षी त्याने हे यश मिळवले. २४ वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणा-या नोव्हाक जोकोविचला गतवर्षी झालेल्या विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्काराझने पराभूत केले होते. यंदाही त्यानेच विम्बल्डनवर नाव कोरले. सलग दोन वेळा विम्बल्डन मिळवणारा इतिहासातील तो तिसरा खेळाडू ठरला. स्पॅनिश टेनिसपटू अल्काराझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. त्याने वडिलांच्या अकॅडमीतूनच टेनिसचे धडे गिरवले. त्याने अनेक स्पॅनिश आणि युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. जगातील नंबर एकचा माजी खेळाडू जुआन कार्लोस फेरेरो त्याचा ट्रेनर आहे.
रॉजर फेडररची बरोबरी
कार्लोस अल्काराझने चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत महान टेनिसपटू रॉजर फेडररची बरोबरी केली. फेडररनंतर कार्लोस अल्कारेझ आपल्या कारकिर्दीतील पहिले ४ ग्रँडस्लॅम अंतिम सामने जिंकणारा खेळाडू ठरला. कार्लोसने आतापर्यंत दोनदा विम्बल्डन, एकदा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली आणि चारही वेळा तो जिंकला.