मुंबई : प्रतिनिधी
अल्पवयीन पत्नीशी सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कारच आहे असे बॉम्बे हायकोर्टाने एका खटल्याच्या निकालादरम्यान म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. तसेच या प्रकरणातल्या आरोपीची दहा वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.
कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवायचे असतील तर तिचे वय १८ किंवा त्याहून जास्त असले पाहिजे. मात्र १८ हून कमी वयाच्या मुलीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले तरीही तो बलात्कारच आहे. ती मुलगी लग्न झालेली असो किंवा लग्न न झालेली. तिच्याशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले तरीही तो बलात्कार आहे असे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने फैसला सुनावताना या गोष्टीवर भर दिला आहे की, १८ वर्षांखालील कुठल्याही मुलीशी शरीरसंबंध ठेवणे हा तिच्यावर बलात्कार आहे. ते सहमतीने झालेले शरीरसंबंध असतील तरीही तो बलात्कारच आहे.
ती मुलगी लग्न झालेली असो किंवा नसो ती अल्पवयीन असेल तर तो बलात्कारच मानला जाईल. एवढेच नाही तर या खंडपीठाने आरोपीला मिळालेली १० वर्षांची शिक्षाही कायम ठेवली आहे. कनिष्ठ न्यायालयात १० वर्षांची शिक्षा झाल्याने आरोपीने नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे तसेच अल्पवयीन मुलीशी सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कारच आहे असे म्हटले आहे.