नागपूर : कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेचा तीव्र निषेध देशभर केला जात असताना आता नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हीडीओ आरोपीने व्हायरल केले आहेत. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या महितीनुसार ही घटना येथील वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. साहील सिद्धार्थ नितनवरे (१९, डिफेन्स कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मुलीची ओळख ही ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, त्याने तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. या ठिकाणी त्याने तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडीओ देखील काढले होते.
दरम्यान, यानंतर आरोपीने पीडितेचे व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता त्याने तिला मारहाणदेखील केली. असा प्रकार दोन वर्षे चालला. मात्र, पीडितेने आपल्यावरील अत्याचाराची आपबीती पालकांना सांगितली. तिच्या आईवडिलांनी आरोपी मुलाला जाब विचारला असता त्यांना देखील आरोपीने धमकावत मुलीचे व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने मुलीच्या नातेवाईकांना तिचे अश्लील फोटो व व्हीडीओ पाठवले व ते फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केले. दरम्यान, ही बाब पुढे आल्यावर मुलीने वाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी साहीलविरोधात पोक्सो अॅक्ट तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी साहील नितनवरेला अटक केली असून, सध्या त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा
दरम्यान, मागील काही काळापासून, नागपूरमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खून, दरोडे, दारू पिऊन गाडी चालवणे, यासारख्या घटनांत वाढ झाली. यातच आता महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यामुळे गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे नागपूरकर चिंतेत आहेत.