लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण जगामध्ये आपला देश विविधतेने नटलेला, एकतेने बांधलेला एकमेव देश आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत द्वेष भावना मुळ धरु लागली आहे. त्यामुळे देशाच्या एैतिहासीक उज्ज्वल परंपरेच्या वाटचालीत अडथळे निर्माण होत आहेत. ईदनिमित्त आम्ही सर्व तुझी लेकरे मनापासून प्रार्थना करीत आहोत, एै अल्लाह, द्वेष दुर होऊ दे, एकतेने देश विकसीत होऊ दे, अशी प्रार्थना दि. ३१ मार्च रोजी सकाळी ईद-उल-फित्रनिमित्त येथील ईदगाहवर करण्यात आली.
लातूर शहरासह जिल्ह्यात दि. ३१ मार्च रोजी ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. लातूर शहरातील ईदगाहवर सकाळी ९.३० वाजता मुफ्ती बिलाल यांच्या मागे ‘ईद-उल-फित्र’ची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागीतला. दोन्ही हात उचलून मनापासून गहिवरुन अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. तत्पुर्वी मुफ्ती ओवेस यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगीतलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगीतला.
अगदी सकाळपासूनच उन्हाचा तडाखा बसत होता. परंतु, ईद-उल-फित्रचा उत्साह दिसुन येत होता. ईदनिमित्त नवे कपडे, सुरमा, अत्तर, टोपी, रुपाल घेऊन मुस्लिम बांधव अगदी सकाळपासूनच ईदगाहकडे निघालेले होते. युवक, ज्येष्ठ, बच्चे कंपनीचा उत्साह होता. पुरुष मंडळी ईदगाहकडे निघाली, घराघरातील महिला भगिणीही ‘ईद-उल-फित्र’च्या नमाजच्या तयारीला लागली. ईदगाहवर सामूहिक नमाज झाल्यानंतर शहरातील विविध मस्जिदमध्ये नमाज झाला.
जे ईदगाहवर पोहोचू शकत नाहीत, अशा ज्येष्ठांसाठी मस्जिदमध्ये नमाजची सोय करण्यात आलेली होती. गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात पावसाची हजेरी आहे. या पावसामुळे उडाक्यापासून उसंत मिळाली. अल्हाददायक वातावरणात ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार विक्रम काळे, काँग्रेसचे शहरत जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन शेटे, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, तहसिलदार सौदागर तांदळे, प्रा. प्रविण कांबळे, अंकूश नाडे, अॅड. समद पटेल, इस्माईल शेख यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक
संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थि राहून मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-फित्र’च्या शुभेच्छा दिल्या.