लातूर : प्रतिनिधी
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज दि. २२ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त लातूर शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंचीच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. या निमित्ताने अवघे लातूर शहर रामरंगी न्हाले आहे.
शेकडो वर्षानंतर होणा-या श्रीराम मूर्ती स्थापना कार्यक्रमाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. यानिमित्त लातूर शहर भाजपाच्या वतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंचीच्या भव्य प्रतिमेचे पूजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे व महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या पूजन सोहळ्यास खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार,आमदार रमेश कराड यांच्यासह लोकसभा प्रमुख किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेच सकाळी ९ वाजता रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसा पठण सोहळा होणार आहे. सकाळी ९.३० वाजता कारसेवकांचा सन्मान व सत्कार सोहळा होईल. सकाळी १० वाजता भव्य आतिषबाजी व दीपोत्सव सोहळा होणार आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त ५१ हजार लाडूंचा महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या वितरण सोहळ्याचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत शहरात मंडळनिहाय महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. दुपारी २ ते ४ या कालावधीत बाजारपेठ परिसरात महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
प्रभू श्रीरामचंद्र मुर्ती स्थापनेनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये सायंकाळी दीपोत्सव व आतिषबाजी सोहळा होणार आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त्त विद्यमाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे. लातूर शहर व परिसरातील रामभक्त्त, नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले आहे.
श्री राम यांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सर्वत्र आनंदाला उधान आले आहे. उत्साहापुर्ण वातावरण आहे. लातूर शहरात दिवाळी साजरी केली जात आहे. संपूर्ण बाजारपेठ विद्यूत रोषणाईने लखलखून गेली आहे.