सोलापूर – युवा पिढीतील प्रसिद्ध तबलावादक अविनाश पाटील यांच्या सोलो तबलावादनाच्या मैफली यूकेतील लंडन, न्यू कॅसल, रेडिंग तसेच आयर्लंडमधील डब्लीन येथे होणार आहेत. येथील विविध महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक संस्था यांच्यातर्फे दिनांक ६ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान त्यांच्या तबलावादनाच्या मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील यांनी तबलावादनात संगीत अलंकार पदवी व एम. ए., तबलावादनात पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
पाटील यांनी तबल्याची तालीम त्यांचे वडील कलापिनी संगीत विद्यालयाचे संचालक व प्रसिद्ध तबलावादक गुरु पं. प्रमोद पाटील व दिल्ली घराण्याचे ख्यातनाम तबलावादक पं. उमेश मोघे यांच्याकडे घेतली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटीव मेहनतीच्या जोरावर प्रचंड संघर्ष व कष्ट करून त्यांनी स्वकर्तृत्वावर स्वत:ची वेगळी ओळख संगीत विश्वात निर्माण केली आहे.
पद्मभूषण पं. राजन-साजन मिश्रा यांच्यासारख्या जागतिक ख्यातीच्या अनेक कलाकारांना त्यांनी साथ-संगत केली आहे, तसेच सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह देशात व परदेशातील रसिकांची त्यांनी दाद मिळवली आहे. ग्रामीण भागात जन्मलेल्या पाटील यांनी अपार मेहनतीने संगीत क्षेत्रात यश संपादन केले आहे.