मुंबई : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणा-या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नाते तोडले नाही. ख-या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याशिवाय मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणा-या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.
गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. याचा सार्थ अभिमान आहे.