22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये भाजपला धक्का; विवेक कोल्हे शरद पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; विवेक कोल्हे शरद पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई : विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गट सत्ताधारी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पुण्यातील इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि कोल्हापुरातील समरजित घाटगे हे शरद पवार गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. अशातच विवेक कोल्हे यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजपला चांगलाच धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे आज एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ लढत होणार?

दरम्यान, विवेक कोल्हे हे कोपरगावमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निश्चित केली आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे. यामुळे विवेक कोल्हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील आणि तुतारी हाती घेतील, अशी चर्चा कोपरगावमध्ये सुरू आहे. तसे झाले तर कोपरगावमध्ये ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ अशी चुरशीची लढत पहावयास मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR