23.3 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी विधानसभेत तिकिट वाटपाची सर्व जबाबदारी फडणवीसांवर

आगामी विधानसभेत तिकिट वाटपाची सर्व जबाबदारी फडणवीसांवर

मुंबई : राज्यात सर्वच प्रमुख पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला तिकिट मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांना तिकिट वाटपाची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पुन्हा सोपवण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांना राज्यात प्रचारात उतरवले होते, मात्र भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. कोणत्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड आहे आणि कोणत्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, तसेच कुठल्या मतदारसंघात भाजपला जनतेची पसंती आहे, याचा सर्व्हे भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपच्या सर्व्हेत विद्यमान आमदार मतदारसंघात अयशस्वी असल्यास तिकिट नाकारण्यात येणार असल्याचेही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

कोणाला तिकिट द्यायचे फडणवीस ठरवणार-शेलार
दरम्यान, रविवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, कोणाला तिकिट दिले जाणार हे देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. त्यांना संपूर्ण अधिकार देऊन पुढील वाटचाल सुरू करण्याची भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR