मुंबई : प्रतिनिधी
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि उत्तरेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला.
आता जोमाने कामाला लागा. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला हे गतवैभव काँग्रेस पक्षाला परत मिळवून द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिका-यांना केले.
मागील काळात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष ‘नो व्हेयर’ झालेला असताना, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन आणि सत्कार काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला. यावेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळवण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मित्रपक्षांना सोबत घेऊन उमेदवारांना बळ दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि इतर पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही जागा आपण मिळवू शकलो, असे पटोले यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस पक्षाचा खुंटा बळकट करण्यासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी जे कष्ट घेतले, त्यामुळे राज्यात एकही खासदार नसतानाही २०२४ च्या या निवडणुकीत ती संख्या १३ वर नेली. विदर्भात एका जागेवर समाधान मानलेल्या काँग्रेसने यावेळी पाच जागा आणि महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवल्या. हे यश काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे बळ आणि आत्मविश्वास देणारे ठरले आहे, असे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटले.