लातूर : प्रतिनिधी
आदिशक्तीचा जागर मांडणा-या नवरात्रोत्सवास आज दि. ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने आज घटस्थापना केली जाणार असून आजपासुन दि. १२ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. घटस्थापनेनिमित्त बाजारपेठही गजबजली आहे.
आई जगदंबा देवीच्या विविध रुपांची पूजा नवरात्रीत केली जाते. याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देवीच्या मंदीरात आणि विविध मंडळांच्या वतीने गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून जोरदार तयारी केली जात आहे. कमानी उभारणे, मंदिराच्या प्रतिकृती उभारणे, विद्यूत रोषणाई करणे आदी कामे वेगाने पुर्ण करण्यात आली आहेत. देवीच्या मंदिरांची रंगरंगोटीची पुर्ण झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासून दूपारी १.४५ वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. यंदा अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे.
श्री कालिका देवी मंदिर
येथील जुना औसा रोड परिसरातील श्री कालिका देवी मंदिरात आज सकाळी ७ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. दररोज सकाळी अभिषेक, त्यानंतर पुजा होणार आहे. दुपारी ३ ते सहा या वेळेत दररोज महिला भजनी मंडळ भजन सादर करणार आहे. त्यानंतर रात्री मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होणार आहे. येथील भव्य रांगोळी हा अनेकांसाठी उत्सूकतेचा क्षण असतो. अष्टमीच्या दिवशी रांगोळी काढण्यास सुरुवात होणार आहे. दस-याच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
श्री जय जगदंबा मंदिर
शहरातील गंजगोलाईतील श्री जय जगदंबा मंदीरात आज सकाळी प्रथमत: उत्सवमुर्तींचे पूजन केले जाते. त्यानंतर मिरवणुक काढून वाजत-गाजत मंदिरला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यानंतर उत्सवमुर्ती मंदिरात आणली जाईल. दुपारी १.०५ मिनीटांनी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे. याची जय्यत तयारी पुर्ण झाली आहे. नवरात्रीत या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
श्री कुलस्वामिनी माता भवानी मंदिर
येथील कुलस्वामिनीनगर(सोनानगर) मधील श्री कुलस्वामिनी माता भवानी मंदिरात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सप्तसतीचे पाठ होणार आहे. त्यादरम्यान दुपारी १२ वाजता सौ. व श्री अमोल अनिलराव पाटील आणि सौ. व श्री बबनराव वीर यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. संपुर्ण नऊ दिवस दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता हभप सद्गुरु गहिनीना िमहाराज यांचे कीर्तन होणार आहे. विजयादशमीच्या दिवशी दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणुक सोहळा होणार आहे.