लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात झाले. पोहरेगाव येथे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबीर दि. १४ ऑगस्टपर्यंत म्हणजेच संपूर्ण आठवडाभर सुरु राहणार आहे.
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार त्र्यंबक भिसे, सर्जेराव मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, गटविकास अधिकारी सुमित जाधव, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. कुलकर्णी, डॉ. भालचंद्र चाकूरकर, लालासाहेब चव्हाण, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, अनुप शेळके, उमाकांत खलंग्रे, रमेश सूर्यवंशी, शेषराव हाके पाटील, उद्धव चेपट, तानाजी कांबळे, नागनाथ कराड, आशादुल्ला सय्यद, शिरीष यादव, सरपंच ज्योती मोरे, दत्तात्रय सरवदे, शालीवाहन सरवदे, विश्वनाथ कागले, प्रकाश सूर्यवंशी, प्रमोद कापसे आदीसह परिसरातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
विकासरत्न विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरसारख्या ठिकाणी त्यांनी बॅराजेसची शृंखला तयार केली. या भागाची भौगोलिक परिस्थिती, गरज लक्षात घेऊन नव्या योजनांची आखणी करुन त्याची अंमलबजावणी केली. यात विकासाचा दृष्टीकोन आहे. हाच दृष्टीकोन घेऊन यापुढेही जनतेच्या खांद्याला खांदा लावून काम करु, असे आ. धिरज देशमुख यांनी यावेळी सांगितले.