लातूर : प्रतिनिधी
खरेदीदाराने शेतमाल घेतल्यानंतर लागलीच पैसे अदा करावेत, अशी मागणी आडत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नियमाप्रमाणे १० दिवसांनंतरच आडत्यांना पैसे देण्याच्या निर्णयावर खरेदीदार ठाम असल्याने गेल्या १ जुलैपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे या बाजार समितीचा नावलौकी कर्नाटक व आंध्रप्रदेशापर्यंत आहे.
बाजार समितीत दररोज किमान १० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असते. परंतु, आडते व खरेदीदार यांच्या वादामूळे गेल्या १३ दिवसांपासून आडत बाजार बंद असल्याने १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या उलाढालीवर पाणी फेरलेगे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १३ दिवसांपासून सौदाच निघाला नाही. त्यामुळे शेतक-यांना शेतमालाच्या विक्रीसाठी दुसरी बाजारपेठ शोधावी लागत आहे. गेल्या महिन्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन, हरभरा आणि तुरीची ब-यापैकी आवक होती. मात्र आडते आणि खरेदीदार यांच्यात पेमेंटवरुन वाद सुरु झाला. खरेदीदाराने शेतमाल घेतल्यानंतर लगेच पेमेंट करावे, अशी आडत्यांची तर १० दिवसांनंतरच आडत्यांना पेमेंट देण्याच्या निर्णयावर खरेदीदार ठाम आहेत. परिणामी गेल्या १३ दिवसांपासून आडत बाजारातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.
बाजार समितीतील व्यवहार सुरु व्हावेत, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अटोकाट प्रयत्न सुरुच आहेत. आडते आणि खरेदीदार यांनी वाद न घालता आपापसात समन्वयाने व्यवहार सुरळीत करावेत, असे प्रयत्न गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु होते. परंतू, आडते आणि खरेदीदार आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने गेल्या १३ दिवसांत सौदाच निघाला नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने कठोर भुमिका घेत आडत बाजारातील परवानाधारक ५५० खरेदीदारांना शेतमालाच्या सौद्यात २४ तासांच्या आत सहभागी व्हावे, या आशयाच्या नोटीसा दि. ११ जुलै रोजी बजावल्या. त्यामुळे नोटीसा बजाल्याच्या २४ तासांनंतर शनिवारी खरेदीदार आपला निर्णय मागे घेतील व सौदा निघेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, परंतू, तसे न झाल्याने शनिवारीही सौदा निघाला नाही. त्यामुळे आता बाजार समिती प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.