सोलापूर : महागाई, बेरोजगारी, देशातील अराजकता, प्रश्न विचारणाऱ्या १४६ खासदारांचे निलंबन प्रकरण, संविधानिक संस्था तोडण्याचा आणि लोकशाही संपविण्याचे काम आणि शेतकरी, कामगारविरोधी धोरणे या सर्वांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरुन आवाज उठविण्यात येणार आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार राहावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
२८ डिसेंबर या काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विशाल रॅली आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन केले असून यासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. याच्या नियोजनसाठी शनिवारी, काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या बैठकीत आमदार शिंदे बोलत होत्या. प्रारंभी विधिमंडळ
अधिवेशनात सोलापूरचे विविध प्रश्न मांडल्याबद्दल आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, तौफिक हतुरे, उदयशंकर चाकोते, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, पशुपती माशाळ, तिरुपती परकीपंडला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुढील वर्षी लोकसभेसह अनेक निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साह निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक २०२४ चे रणशिंग
नागपूरच्या काँग्रेस रॅलीतून फुंकले जाणार आहे. तेव्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नागपूर येथील रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार शिंदे यानी केले.
२८ डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात दहा लाख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘हम है तैयार’ या स्लोगनखाली काढण्यात येणाऱ्या विशाल रॅलीतून लोकसभा २०२४ निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी सोलापूर शहरातून पाच हजार व जिल्ह्यातून पाच हजार असे एकूण दहा हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासाठी शहरातून २० लक्झरी बसेस व ५० हून अधिक चारचाकी वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. २७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता काँग्रेस भवनातून हा ताफा नागपूरकडे निघणार असल्याचे नरोटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तीकोंडा, प्रवीण निकाळजे, तौफिक हत्तुरे, तिरुपती परकीपंडला उपस्थित होते.