26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रआता लक्ष विधानसभेकडे

आता लक्ष विधानसभेकडे

पुणे : विनायक कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील मतदार कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. पण अखेर जिल्ह्यातील चार जागा महाविकास आघाडी आणि महायुती यांनी ‘फिफ्टी-फिफ्टी जिंकल्या. आता लक्ष विधानसभेकडे असणार आहे.

पुण्याची जागा भारतीय जनता पक्षाने जिंकत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे सन २०१४, २०१८ आणि २०२४ या तीनही निवडणुकीत पक्षाने तीन नवे चेहरे दिले आणि ते यशस्वी झाले आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना दुस-यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांनी दिली आहे. सध्याच्या स्थितीच्या राजकीय पार्श्वभूमीवर येत्या चार महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका लक्षवेधी ठरणार असल्याचे दिसते.

खरे तर या निवडणुकीत चारही लोकसभा मतदारसंघांत ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले नाही मात्र मतदारांनी विजयी उमेदवारांना जे मतांचे झुकते माप दिले ते मताधिक्य एका लाखापेक्षा अधिक आहे हे नोंद घेण्यासारखे आहे. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्याचे कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी जी वेगळी भूमिका घेतली त्याचा निवडणुकीमध्ये नेमका काय परिणाम होणार याबाबतचे अनेक अंदाज बांधण्यात येत होते. मतांची गणिते मांडण्यात येत होती. पण अखेर मतदारांनी विद्यमान खासदार सुळे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली. आता यापुढे उपमुख्यमंत्री पवार यांच्या भूमिकेकडे अथवा रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार आढळराव पाटील मूळ पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून निवडणुकीला सामोरे गेले. या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले पण या निवडणुकीत त्यांना यशापासून दूर राहावे लागले आहे. प्रचाराच्या कालावधीत दोन्ही उमेदवारांनी परस्परांवर टीका-टिप्पणी केली पण अखेर मतदारांनी कोल्हे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या तीनही निवडणुकीत नवे चेहरे पक्षाने दिले आणि ते यशस्वी ठरले. भाजपात यावेळी सुरुवातीच्या काळात असणारी नाराजी कमी झाल्याने आणि महायुतीमधील घटक पक्षांनी संघटितपणे काम केल्याने सकारात्मक निर्णय समोर येण्यास हातभार लागला असे म्हणता येईल. मावळ लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेतील दोन नेते निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले त्यामुळे चुरस निर्माण झाली होती. खरे तर चारही मतदारसंघांतील लढती या उत्कंठापूर्ण आणि चुरशीच्या झाल्या.

लोकसभा निवडणुकीची परीक्षा पूर्ण झाली असून नजीकच्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि दोन महानगरपालिकांच्या (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) निवडणुकांची परीक्षा होणार आहे. या परीक्षांचे रिझल्ट कोणाच्या बाजूने असणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR