मुंबई : गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून येतो आहे. नागपूर, ठाणे, गिरगाव, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये शोभायात्रा आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान गिरगावच्या शोभायात्रेत आदित्य ठाकरेंनी ढोलवादन केले आहे. त्यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी आज उत्साहात ढोलवादन केले. साधारण ४५ सेकंदांच्या या व्हिडीओत आदित्य ठाकरे हे उत्साहात ढोलवादन करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडीओ शिवसेना ठाकरे गटानेच पोस्ट केला आहे. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर दिसत आहेत. मुंबईतल्या गिरगावात सकाळपासूनच शोभायात्रा, बाईक रॅली, चित्र रथ यांचा उत्साह दिसून येतो आहे. आज गुढीपाडवा असल्याने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच गिरगावकर सज्ज झालेले दिसले. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ढोलवादन करत आपला सहभाग दर्शवला.
गिरगावात १९९९ पासून शोभायात्रा
गिरगावात १९९९ पासून शोभायात्रा काढली जाते. डोंबिवली, ठाणे या ठिकाणीही शोभायात्रा काढली जाते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काढल्या जाणा-या या शोभायात्रेत लोकांसह, सेलिब्रिटी, नेतेमंडळीही उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात. आज आदित्य ठाकरेंनीही त्याच जोषात ढोलवादन करून आपला सहभाग शोभायात्रेत नोंदवला. त्यांच्या ढोलवादनाचा व्हीडीओ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पोस्ट केला आहे.