प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणा-या दिवाळीच्या सणाला सोमवारपासून प्रारंभ झाला. दिवाळी हा सकारात्मकता आणि आनंद पसरविणारा सण. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पारंपरिक प्रथेनुसार आणि कथेनुसार गाय-वासराची पूजा केली जाते. त्यांचे पाय धुतले जातात. हळद-कुंकू लावले जाते, फुले वाहिली जातात आणि गोड नैवेद्य भरविला जातो. त्यांची यथायोग्य पूजा केली जाते. शहरात गाय-वासराच्या मूर्तीची पूजा केली जाते, पण आता गावखेड्यातही वरचेवर पशुधन कमीच होत चालले आहे. पशुधन कमी होण्याची अनेक कारणे दिली जात आहेत.
कित्येक वर्षांपासून याच पशुधनाने गावखेड्यात कुटुंबे जगवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेती पिकवली आणि टिकवली.आज परिस्थिती बदलत चालली आहे. कृषिप्रधान देशात शेतीचे आणि पशुधनाचे महत्त्व समजावून सांगणारा असा कोणी नेताच उरला नाही. ते फक्त राजकारण करण्यातच रमले आहेत. उद्या शेती पिकलीच नाही तर.. फिर उसके बाद… एक तारा बोले! शेती पिकलीच नाही तर देशात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होईल आणि पशुधन असेच संपत गेले तर फक्त गाय-वासरांच्या मूर्तीचीच पूजा करावी लागेल! धनत्रयोदशीपासून दीपोत्सवाचा मुख्य काळ सुरू होतो. यंदा नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी चार स्वतंत्र दिवसांची दिवाळी साजरी होत आहे. सर्वसामान्य माणूस कितीही अनंत अडचणीत असला तरी सण गोड करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा तो पाळताना दिसतो, रिण काढून का होईना तो सण साजरा करणारच. सध्या दुथडी भरून वाहणारा बाजार हे त्याचेच प्रतीक! धनत्रयोदशी हा दिवाळी पर्वातील एक महत्त्वाचा दिवस.
पौराणिक कथेनुसार या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत पात्रासह प्रगट झाले. म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि सुख-शांतीची कामना केली जाते. धनत्रयोदशीला भांडी, सोने-चांदी आणि इतर धातू, वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि समृद्धी आणते. यासोबतच या दिवशी मीठ, झाडू आणि इतर वस्तूंची खरेदी केली जाते, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-शांती नांदेल. धनत्रयोदशीचा दिवस घराची साफसफाई आणि सजावट करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. कारण या दिवशी त्यांनी आयुर्वेद, आरोग्य आणि धन यांचे दान केले होते. या सणाचा मुख्य उद्देश आहे. धन, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती. धनत्रयोदशीला आध्यात्मिक महत्त्व आहे. यामुळे जीवनात एक नवीन दिशा मिळवता येते.
भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी मिळवणे शक्य होते या सणाच्या निमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात. त्यामुळे प्रेम आणि एकता वाढते, सामाजिक बंधने मजबूत होतात. या दिवशी पूजा करण्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मानसिक आरोग्यासाठी ती लाभदायक ठरते. धनत्रयोदशी ही केवळ संपत्तीची पूजा नाही, तर ती आरोग्य, आनंद आणि एकता आणण्याची संधी आहे. या दिवशी केलेले आचरण आणि संकल्प जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात. दिवाळीच्या दिवसांत संपूर्ण शहर आनंदामध्ये रंगलेले असते. मात्र, असाध्य व्याधींना तोंड देत अनेक रुग्णांना रुग्णालयामध्येच राहावे लागते. अशा रुग्णांनाही दिवाळीचा आनंद घेता आला पाहिजे. यासाठी रुग्णालयात बाल रुग्णांसाठी दिवाळी मेळाव्याचे आयोजन करावयास हवे. दिवाळी हा सकारात्मकता आणि आनंद पसरविणारा सण असल्याने अशा उपक्रमाद्वारे रुग्णालयातील बालरुग्णांच्या चेह-यावरही हसू फु लवता येईल. दिवाळीत कमीत कमी वायू व ध्वनिप्रदूषण होईल या बेताने फटाके फोडले जावेत. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनिप्रदूषण होते.
त्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्यास दिवाळीचा आनंद अधिक चांगल्या रीतीने घेता येईल. दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेषत: लहान मुलांची काळजी घ्यावी. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आलेली दिवाळी नक्की कुणाची? गरीब सामान्यांची की असामान्य श्रीमंत राजकीय पुढा-यांची असा संभ्रम पडल्यास नवल नाही. दिवसागणिक वाढणा-या महागाईचा राक्षस उरावर स्वार झाला असला तरी गरिबाच्या झोपडीतही मिणमिणती पणती तेवत असते. दिवाळी गरिबाला वर्षभराची ऊर्जा देणारी असते. गावाकडे गायीची बछड्यासह पूजा करणारी वसुबारस, शेतीतील पीक अल्प का असेना, धनधान्याची पूजा करणारी धनत्रयोदशी आणि बहिणीवरील मायेपोटी दूरवरून धावपळ करीत येणा-या भावाची भाऊबीज म्हणजे या गरिबांसाठी असलेला सेफ्टी व्हॉल्व्हच! खिशात पैसे खुळखुळत नसले तरी असलेल्या दीड दमडीत स्वत:साठी नाही पण बायको-मुलांसाठी कपडे घेणारा कष्टकरी या चार दिवसांत गरिबीला विसरून जातो.
झोपी गेलेल्या मुलाच्या हातातील अर्धवट खाल्लेला लाडू पाहून त्याला कौटुंबिक सुखाचे समाधान मिळते. श्रीमंतासारखी फटाक्यांची आतषबाजी करता आली नाही तरी न वाजलेले फटाके गोळा करून ते वाजवताना मुलांच्या चेह-यावरील हसू हीच त्याच्यासाठीची खरी दिवाळी. दिवाळी संपते, पणती विझते पण झोपी गेलेल्या मुलांचे आनंदी चेहरे पाहून तो ताजातवाना होतो व पुन्हा कामाला लागतो! प्रसिद्धीची एकही संधी न सोडणारे राजकीय नेते आपले छायाचित्र असलेली सुगंधी उटणे पाकिटे दीपावली सणादरम्यान घराघरांत पोहोचवत असतात. मात्र, यंदा आचारसंहिता असल्याने उटण्याचा राजकीय सुगंध हरवला आहे. तर काहींनी आधीच डाव साधल्याने नागरिकांपर्यंत त्यांना आपली दिवाळी गिफ्ट पोहोचविण्यात यश आले आहे.
ऐन दिवाळीतच आचारसंहिता लागू झाल्याने दिवाळी पहाट व दीपसंध्या या कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य माणूस महागाईने बेजार झाला आहे. ही रोजचीच रड असली तरी खर्चाची बाजू थोडी पुढे-मागे करून माणूस वेळ मारून नेतो आणि दिवाळीसारखा मोठा सण शक्य तितक्या आनंदी वातावरणात जावा यासाठी प्रयत्नशील असतो. सराफी बाजारातील सोन्या-चांदीची घोडदौड पाहता सर्वसामान्य माणसाला त्यात फारसे स्वारस्य उरलेले नाही. सण गोड करण्याची आपली परंपरा इमानेइतबारे जपणा-या सर्वसामान्याच्या आयुष्यात भविष्यात ख-या अर्थाने गोडवा निर्माण होईल अशी आशा-अपेक्षा मनी बाळगत हा मांगल्याचा सण उत्साहाने साजरा करू या!