23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeसंपादकीयआपलं हक्काचं व्यासपीठ!

आपलं हक्काचं व्यासपीठ!

‘एकमत’चा आज ३३ वा वर्धापनदिन! लोकनेते विकासरत्न मा. विलासरावजी देशमुख यांनी १९९१ साली ‘एकमत’ची मुहूर्तमेढ रोवताना जो विचार समोर ठेवला होता त्या विचारावर दृढपणे वाटचाल करत ‘एकमत’ने आपला तीन दशकांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत चौथ्या दशकातील प्रवासाची दमदार वाटचाल सुरू केली आहे. ‘एकमत’ हे आपल्या भागातील जनतेच्या आशा-आकांक्षांचे हक्काचे व्यासपीठ बनावे हीच मा. विलासराव देशमुख यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छाच ‘एकमत’चा मूलमंत्र बनला व याच मूलमंत्रावर ‘एकमत’ने आपला तीन दशकांचा प्रवास पूर्ण केला व यापुढेही याच मूलमंत्रावर ‘एकमत’चा प्रवास सुरू राहील.

‘एकमत’ आज आपल्या भागातील प्रत्येकाचे हक्काचे व्यासपीठ बनला याचे समाधान आहे. या प्रवासात ‘एकमत’ने सदैव जनतेच्या प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडली. मात्र तेवढ्यावर न थांबता या प्रश्न, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सदैव पाठपुरावाही केला. ‘एकमत’ने केवळ जनतेच्या प्रश्न, समस्यांनाच वाचा फोडली नाही तर त्यांच्या आशा-अपेक्षांनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनेक नवोदित लेखकांना साहित्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तीन दशकांच्या ‘एकमत’च्या प्रवासात अनेक पत्रकार, उपसंपादक, संपादक, स्तंभलेखक, कवी, साहित्यकार, समीक्षक, लेखक घडले, जे आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कार्यरत आहेत. या अर्थानेही ‘एकमत’ आपल्या भागातील जनतेचे हक्काचे व्यासपीठ बनले याचे मनोमन समाधान आहे.

‘आपला एकमत’ ही भावना निर्माण करण्यात ‘एकमत’ला या प्रवासात यश मिळवता आले याचा मनस्वी आनंद आहे. वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, मार्गदर्शक, विक्रेतेबंधू या सर्वांनीच ‘एकमत’वर भरभरून प्रेम केले, सदैव भक्कम पाठिंबा दिला आणि त्या बळावरच कुठल्याही वृत्तपत्रासाठी अभिमानास्पद व गौरवशाली ठरणारा तीन दशकांच्या यशस्वी प्रवासाचा टप्पा पार करून ‘एकमत’ने चौथ्या दशकाचा आपला प्रवास सुरू केला आहे. आज ३४ व्या वर्षात पदार्पण करताना मागे वळून पाहिले तर ‘एकमत’साठी हा प्रवास किती कठीण होता हे दिसते. ९०च्या दशकात अत्यंत प्रतिथयश व नावाजलेले दैनिक मानल्या जाणा-या ‘मराठवाडा’वृत्तपत्राची लातूर येथून निघणारी आवृत्ती व्यावसायिक व आर्थिक कारणांमुळे बंद झाली.

म्हणजे एका अर्थाने लातूरसारख्या ग्रामीण भागातून वृत्तपत्र चालविण्याचा प्रयोग फसला होता. अशावेळी हा फसलेला प्रयोग यशस्वी करून दाखविण्याचे आव्हान स्वीकारणे हे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे नव्हतेच! मात्र, मा. विलासराव देशमुख यांनी आर्थिक शहाणपणापेक्षा सामाजिक बांधीलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि ‘एकमत’ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे हे धाडस होते. मा. विलासरावजी देशमुख यांनी हे आव्हान नुसते स्वीकारलेच नाही तर ते यशस्वीही करून दाखविले! ‘एकमत’च्या रोपट्याला मा. साहेबांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने हे रोपटे विपरीत परिस्थितीतही रुजले व त्याचा वटवृक्षही झाला. याचे श्रेय अर्थातच मा. विलासरावजी देशमुख व त्यांच्या पश्चात मा. वैशालीताई देशमुख व संपूर्ण देशमुख कुटुंबीयांचेच आहे. ‘एकमत’ चालविताना सलग कित्येक वर्षे आर्थिक नुकसानीचा भार उचलत देशमुख कुटुंबाने ‘एकमत’ची काळजी घेतली. त्यामागे मा. विलासरावजी देशमुख यांनी ‘एकमत’ जन्माला घालताना जे सामाजिक बांधीलकीचे सूत्र अंगीकारले तेच आजही कायम असल्याचे कारण आहे.

‘एकमत’ची उभारणी करताना मा. विलासरावजी देशमुख यांनी ‘एकमत’कडे व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक बांधीलकी म्हणून वृत्तपत्र चालविण्याचा मूलमंत्र दिला होता व तो खोलवर रुजवलाही! त्यामुळे भलेही ‘एकमत’चे अर्थकारण स्पर्धक वृत्तपत्रांच्या तुलनेत भरभक्कम झाले नाही पण आपल्या मातीशी असणारी नाळ घट्ट ठेवण्यात ‘एकमत’ यशस्वी झाला आहे. या तीन दशकांच्या प्रवासात ‘एकमत’च्या वाट्याला अनेक स्थित्यंतरांचा, बदलांचा, उलथापालथीचा काळ आला. मात्र, हे सगळे स्वीकारून व त्यावर मात करून ‘एकमत’ मा. विलासराव देशमुख यांनी रुजविलेल्या मूलमंत्रावरून तसूभरही न ढळता आपला प्रवास करत राहिला. त्यामुळेच आज ‘एकमत’व्यावसायिक फायद्या-तोट्यापेक्षा जनतेशी असणा-या बांधीलकीला असणारे सर्वोच्च प्राधान्य टिकवून आहे.

वाचकांच्या मनातील विश्वासार्हता टिकवून आहे. अर्थात हा प्रवास सहजसोपा निश्चितच नाही. आजही कुशल मनुष्यबळापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कमतरतेपर्यंत अनेक अडथळे या प्रवासात कायम आहेत. मात्र, ही आव्हाने स्वीकारून व त्यावर मात करून ‘एकमत’चा अविरत प्रवास सुरू आहे व सुरू राहील. तीन दशकांचा प्रवास पूर्ण करताना कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटाची भर पडली. या संकटाने वृत्तपत्रसृष्टीचे अर्थकारण तर कोलमडलेच पण अनेक अनपेक्षित आव्हानांमुळे वृत्तपत्र व्यवसायाचे पारंपरिक स्वरूपही बदलून गेले. त्यातून वृत्तपत्रांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या नव्या वाटा शोधाव्या लागल्या. अर्थकारण सांभाळण्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागले. आता कोरोनाचे संकट कमी झाले आहे. मात्र, या संकटाने दिलेल्या आर्थिक तडाख्यातून सावरण्यासाठी आजही धडपडावे लागते आहे. त्यामुळे कोरोनापूर्व स्थितीवर परत येण्यास विलंब होतो आहे.

त्याबद्दल एकमत परिवार वाचकांची, हितचिंतकांची, जाहिरातदारांची मनापासून माफी मागतो. अर्थात आम्ही संघर्ष थांबविलेला नाही. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आमचे कठोर प्रयत्न सुरू आहेत व लवकरच त्यात यश मिळेल हा विश्वास आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘एकमत’ने स्वीकारलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मार्गाला वाचकांची मोठी पसंती मिळाल्याने ं्रिल्ल्र‘ी‘ें३.ूङ्मे हे ‘एकमत’चे पोर्टल लोकल ते ग्लोबल प्रवास करते आहे. या पोर्टलला देश-विदेशातील ९० हजार ते एक लाख वाचक रोज भेट देतात, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. या पोर्टलवरील मजकूर विश्वासार्ह राहील व त्याचा दर्जा उत्तरोत्तर वाढत जाईल हाच आमचा सदोदित प्रयत्न आहे. पोर्टलला मिळालेल्या यशाचे संपूर्ण श्रेय ‘एकमत’वर प्रेम करणा-या व ‘एकमत’ला कायम भक्कम पाठिंबा देणा-या वाचकांनाच आहे.

त्यासाठी वाचकांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत. आम्ही वाचकांच्या या ऋणात कायम राहू इच्छितो. आजचा आपला भोवताल कधी नव्हे तो प्रचंड विखारी व नकारात्मक बनला आहे. मानवी मूल्य, सामाजिक मूल्य, तत्त्व, विचार यांना पायदळी तुडवले जाताना पाहणे सर्वसामान्यांच्या नशिबी आले आहे. त्यातून सामाजिक एकोप्यात व बंधुभावात भिंती उभ्या राहत आहेत. सर्वत्र नकारात्मकतेचा प्रभाव कधी नव्हे एवढा प्रचंड वाढतो आहे. तो कमी करून समाजात सकारात्मकता पेरण्याची व ती जोपासण्याची गरज आहे. मा. विलासराव देशमुख यांनी ‘एकमत’मध्ये रुजविलेल्या सामाजिक बांधीलकीच्या वशाचे भान कायम ठेवून ‘एकमत’ समाजात आपल्या परीने सकारात्मकता पेरण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून समाजाच्या हितासाठी व विकासासाठी आपापल्या परीने आपल्या कामकाजातून योगदान देणा-या विविध क्षेत्रांतील मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम ‘एकमत’ राबवतो आहे. यातून समाजातील इतरांनाही सकारात्मकता रुजवण्याची, पेरण्याची प्रेरणा मिळावी हाच हेतू आहे.

यामुळेच या उपक्रमास पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप न देता कृतज्ञता सन्मानाचे रूप देण्याचा आणि ते कायम ठेवण्याचा ‘एकमत’चा प्रयत्न आहे. शिवाय समाजाच्या हितासाठी, विकासासाठी योगदान देणा-यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे, प्रेरणा मिळावी हा ‘एकमत’चा प्रयत्न आहे. त्यातूनच ‘एकमत’ने आपल्या वर्धापनदिन विशेषांकाचे स्वरूप अशा धडपड्या व सकारात्मकता पेरणा-यांच्या कार्याची गौरवगाथा प्रकाशित करणे, वाचकांपर्यंत ती पोहोचवणे असे निश्चित केले आहे. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे व हा उपक्रम यापुढेही कायम सुरू राहील. या उपक्रमाला मिळणारा प्रचंड मोठा प्रतिसाद आमचा उत्साह व हुरूप वाढविणाराच आहे. ‘एकमत’चा हा प्रवास वाचक, हितचिंतक व जाहिरातदार यांच्या भक्कम पाठबळामुळेच शक्य झाला आहे. यापुढेही हा प्रवास असाच अखंडित सुरू राहील, हा विश्वास नव्हे तर खात्रीच! वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, विक्रेते बंधू यांच्या ‘एकमत’ला असणा-या भक्कम पाठिंबा व प्रेमाबद्दल एकमत परिवार आपला कायम ऋणी आहे व यापुढेही याच ऋणात राहू इच्छितो. हे स्नेहबंध उत्तरोत्तर दृढच होत जातील, ही आशा नव्हे
तर खात्रीच!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR