पुणे : लेडी सिंघम अशी ओळख निर्माण करून पोलिसांचा खाक्या दाखवत गुन्हेगारासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री सोनटक्के चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.जळगावमधील बीएचआर (भाईचंद हिराचंद रायसोनी) पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात एकाच दिवशी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदवला गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावरून पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी सुनील झंवर याने गृहविभागाकडे भाग्यश्री सोनटक्के यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
त्यावरुन चौकशी सुरू होती. त्यानंतर गृहविभागाच्या आदेशाने गुन्हा नोंदवला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, भाग्यश्री सोनटक्के यांची शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून पोलिस दलात ख्याती आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.