मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
दरम्यान, मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झाले आहेत. जर करायचे असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळले तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यांंवर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षण तसेच सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यांवर सरकार कारवाई करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले, केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यांची मागणी आहे त्याबाबत देखील सरकारने पहिले नोटिफिकेशन जारी केले आहे, त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही
ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे
ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे, त्यांना सर्टिफिकेट देता येते. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यांनी कशात बसणारेच नोटिफिकेशन काढण्यात आलेय. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले पाहिजे असे आमचे मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.