नेरुळ : आरोग्यदायी रसरशीत अशी जांभळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारपेठेत दाखल झाली आहेत. मात्र यंदा जांभळाचे उत्पादन घटल्याने सध्या बाजारात जांभळाची आवक कमी आहे. त्यामुळे एक किलो जांभळासाठी २०० रुपये मोजावे लागत असून सफरचंदापेक्षाही जांभळे महाग झाल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारपेठेत जांभळाला आकारानुसार प्रति किलो २०० ते ८०० रुपये किलो दर मिळत आहे. विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणा-या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा ते तीस रुपयाला पडतेय. असे असले तरी जंबो साईज जांभळाची मागणी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, ठाणे येथील पालघरमधून एपीएमसी बाजारात सध्या जाभळांची आवक सुरू आहे. जांभळे आरोग्यासाठी उत्तम आणि मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदी करत असल्याचे व्यापारी सुभाष डुंबरे यांनी सांगितले. साधारण जून महिन्यात हंगाम सुरू होऊन एक ते दीड महिना फळहंगाम सुरू असतो. जांभळाची योग्य पद्धतीने निवड करून एक किलोच्या बॉक्समध्ये जांभळे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे पुणे जिल्ह्यातील शेतकरी उमेश झोडगे यांनी सांगितले. सध्या पावसाळा सुरू असून जांभळाचा माल लवकर खराब होण्याची शक्यता असते. मात्र ही जांभळे दोन दिवस टिकत असल्याचेही त्यांनी सांगितले.