18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रआरोग्य सुश्रुषाअंतर्गत वृद्धांना उपचाराची सोय!

आरोग्य सुश्रुषाअंतर्गत वृद्धांना उपचाराची सोय!

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात १०,४९,२५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमांतर्गत वृद्ध रुग्णांना प्रादेशिक वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करूनही उपचार करण्यात येत असून राज्यात ही वृद्धापकाळ सेवा अधिक गतिमान करण्यात येणार आहे. जेणेकरून वृद्धांना सुलभ उपचार मिळणे शक्य होणार आहे.

प्रामुख्याने घरी असलेल्या व रुग्णालयात उपचारासाठी येऊ न शकणा-या वृद्धांना घरीच आरोग्यसेवा मिळणे गरजेचे असून आगामी काळात यावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाणार आहे. वृद्धावस्थेत वेगवेगळ््या आजारांचा सामना करावा लागत असल्याने आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये आठवड्यातून एक दिवस जेरियॅट्रिक क्लिनिक चालविण्यात येते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वृद्ध लोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन आरोग्य तपासणी केली जाते. यात वृद्धावस्थेतील विविध आरोग्य समस्यांचा विचार करून आरोग्य तयापसणी करण्यात येत असून त्यानंतर रुग्णांच्या गरजेनुसार वेगवेगळ््या स्तरांवर उपचार केले जातात. अनेक प्रकरणात घरी जाऊन वृद्धांना आरोग्य सेवा देण्याची गरज असून ही अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमांतर्गत वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे, वृध्दांच्या आरोग्याच्या समस्या ओळखून त्यांचे निरसन करणे, वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे, आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीअ‍ॅट्रिक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे अशा सेवा पुरविल्या जातात. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे ७ कोटी लोक हे ६० वयोगटावरील होते. म्हणजेच ७.७ टक्के लोकसंख्या साठीपुढील होती. २०११ साली हेच प्रमाण वाढून ८.९४ टक्के एवढे झाले. वर्षागणिक हे प्रमाण वाढत असून वृद्धापकाळातील असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही खूप मोठे असल्याने केंद्र व राज्य शासनाच्यामाध्यमातून राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुशा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यात प्राथमिक उपचाराच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक व निदानात्मक उपचार करणे तसेच वृद्धांच्या विविध आरोग्य समस्या ओळखून उपचार करणे आणि गरजेनुसार विभागीय जेरियॅट्रिक केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतात. यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात जिरीअ‍ॅट्रिक क्लिनीक आठवड्यातून एक दिवस चालवले जाते.

वृद्ध रुग्णांसाठी
१० खाटा राखीव
जिल्हा रुग्णालयात वृद्ध रुग्णांसाठी १० खाटा (५ खाटा महिलांसाठी व ५ खाटा पुरुषांसाठी) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन खाटा अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृद्धांसाठी तातडीने उपचारास मदत होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR