मुंबई : विशेष प्रतिनिी
शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कटुता जगजाहीर आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर नेहमी घणाघाती हल्ला करत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत. राजकीय कटुतेच्या या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आली आहे. या बातमीमुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला. एकनाथ शिंदे यांनी २०२२ पूर्वी बँकेत असलेल्या शिवसेनेच्या खात्यातील रक्कम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परत करण्याचा निर्णय घेतला. त्याची माहिती त्यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन बंड पुकारले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची संपत्ती आणि बँकेतील रक्कमेवर दावा करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी २०२२ पूर्वी शिवसेनेच्या बँक खात्यात असणारी रक्कम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेतील रक्कम ठाकरे यांना मिळणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बंडखोरीनंतर आर्थिक अडचणीत आला. यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. दोन्ही पक्षातील राजकीय कटुता विसरुन नवीन उदाहरण एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे २०२२ पूर्वी बँकेत असणारी रक्कम येणार आहे.