मुंबई : प्रतिनिधी
महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केला. भाजप आणि आरपीआयने आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन केले. मुंबई, ठाण्यासह कोल्हापूर, नागपुरातही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपने जोरदार आंदोलन करीत आव्हाडांचा निषेध केला.
हिंगणघाट येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले आणि आव्हाड यांचा बोलविता धनी शरद पवार असल्याचा आरेप करण्यात आला. कोल्हापुरातही ऐतिहासिक बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. सांगलीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले. नांदेड, रत्नागिरीतही जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारले आणि त्यांच्या कृत्याचा निषेध केला.
दरम्यान, आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पोस्टर फाडल्याने त्यांच्या विरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आव्हाड यांनी माफी मागितली. परंतु त्यांच्याविरोधात आता सत्ताधारी गटाने जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. शिवसेना शिंदे गटाने आव्हाडांना अटक करावी अशी मागणी केली आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
भुजबळांकडून पाठराखण
जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेने महाडला गेले. त्यांनी चुकून फोटो फाडला. त्यांनी माफी मागितली. केवळ विरोधी पक्षातील आहेत, म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काहीही अर्थ नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.