लातूर : प्रतिनिधी
एस. टी. कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिकल सुविधा द्याव्यात या मागणीसह प्रलंबित १६ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सेवाशक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्यावतीने आषाढी एकादशी दिवशी (दि. १७) लाक्षणिक राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे.
एस. टी. कामगारांना राज्य सरकारने नेहमीच दुय्यम स्थान व वागणूक दिली आहे. २०२१ मध्ये एस. टी. कामगार आणि संपा दरम्यान तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक होऊन एस. टी. कर्मचा-यांच्या सोळा मागण्या मान्य करूनही आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान आमच्या संघटनेने राज्य सरकार व सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचा इशारा एसटी प्रशासनाच्या वारंवार पत्रव्यवहार करूनही राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही. दि. २० डिसेंबर २०२२ पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक घेऊन एक महिन्यात प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. आमच्या संघटनेचे पदाधिकारी व सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल ३५ दिवस आमरण उपोषण करूनही पुन्हा आश्वासनच मिळाले.
नुकतीच राज्यातील वीज महामंडळाच्या कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात वेतन व भत्ते वाढ करण्यात आली असून एस. टी. महामंडळातील कर्मचा-यांच्या देशभरातून येणा-या श्री विठ्ठल भक्त वारक-यांची गैरसोय होणार असून त्यांच्या गैरसोयीबद्दल सेवाशक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या पदाधिका-यांनी शनिवारी विठ्ठलाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र शासनाला एस.टी. कर्मचा-यांच्या मागण्याबाबत साकडे घातले. संपामुळे वारक-यांना होणा-या त्रासाबद्दल श्री विठ्ठलाची व वारक-यांची माफी मागितल्याचे संघटनेचे सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी म्हटले आहे. वाढीव पगाराबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा उदासीनता दाखवल्याने संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे.