परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे शुक्रवार, दि.१९ जुलै रोजी परभणी जिल्ह्यात आगमन होणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्यांचा सत्कार होणार असून सोनपेठ शहरांमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्ह्यातील नेते विटेकर यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे. या निवडीनंतर प्रथमच विटेकर परभणी जिल्ह्यात येत आहेत. सध्या विटेकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांनी जेजुरी शिर्डी, रांजणगाव येथे दर्शन घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील विविध कार्यकर्ते पदाधिका-यांकडून त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आता विटेकर हे शुक्रवारी परभणी जिल्ह्यात येत आहेत त्यापूर्वी माजलगाव येथे दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार होणार आहे.
ढालेगाव येथे देखील सत्कार स्वीकारल्यानंतर दुपारी १२ वाजता पाथरी शहरात सत्कार होणार असून १.३० वाजता मानवत शहरात दाखल होणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता पोखर्णी नृसिंह येथे आमदार विटेकर हे दर्शन घेणार आहेत. शिरसी मार्गे दुपारी ४ वाजता त्यांची सोनपेठ येथे आगमन होणार असून मोंढातून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहामध्ये सायंकाळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विटेकर यांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीला एक नवचैतन्य प्राप्त झाले असून कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.