मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली. परंतु माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा करिश्मा कायम आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत इतर अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारीही आहेत.
आमदार शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबू पाटे शिवसेना उबाठाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे, देवराम लांडे आणि बाबू पाटे यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.