टी-ट्वेंटीसाठी संघाची निवड जाहीर, दुखापतीमुळे होता बाहेर
मुंबई : प्रतिनिधी
भारत आणि इंग्लंड यांच्या येत्या २२ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तो भारतासाठी शेवटचे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र बीसीसीआयने एका निवेदनाद्वारे शमी दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले नसल्याचे स्पष्ट केले होते.
निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती दिली तर, दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड केली. असे असले तरी निवड समितीने ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्या जागी जुरेलला संधी देण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत छाप सोडणा-या अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीलादेखील या टी-२० संघात स्थान दिले.
दरम्यान मागच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात असलेल्या अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग आणि शिवम दुबेला वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी अनुक्रमे यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी यांना संधी देण्यात आली. मात्र, दुखापतीमुळे मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग या टी-२० मालिकेला मुकणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या या १५ सदस्यीय संघात सहा फलंदाज, सात गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.