आता विरोधी बाकावर बसणार, बैठकीत घेतला निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. दरम्यान, आज इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारमध्ये न राहता सरकारविरोधात राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती देण्यात आली. यावेळी समविचारी पक्षांना सोबत घेऊन संख्याबळ वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय घेणयत आला.
या बैठकीला काँग्रेस पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह विविध पक्षाचे ३३ नेते हजर होते. या बैठकीच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगे यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंडिया आघाडीला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही भारतीय जनतेचे आभार मानतो. जनादेशामुळे भाजपा आणि त्यांच्या द्वेषाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर मिळाले. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा जनादेश आहे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
लोकांना दिलेली आश्वासने आम्ही पाळू, या मुद्यावर आमचे पूर्णपणे सहमत झालेले आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांसाठी आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाबाबत समविचारी असलेल्या इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे स्वागत आहे, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी समविचारी पक्षांना आमंत्रण दिले आहे.
फॅसिस्ट सरकारविरुद्ध
आम्ही लढत राहणार
इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या फॅसिस्ट शासनाविरुद्ध लढत राहील. भाजपाचे सरकार सत्तेवर येऊ नये, ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.