भारतीयांनी दोन्ही देशांत प्रवास टाळावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाढत्या वादाचा विचार करून भारतीय परराष्ट्र खात्याने निर्देश जारी केले आहेत. जोपर्यंत पुढची नियमावली जारी केली जात नाही, तोपर्यंत इराणला जाऊ नका, त्या देशाचा प्रवास टाळा असे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती पाहता या देशात असलेल्या लोकांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि त्या ठिकाणी नोंदणी करावी, असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच या दोन देशांत असलेल्या भारतीयांनी गरज असेल तरच प्रवास करावा आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही परराष्ट्र खात्याने केले आहे.
पुढच्या ४८ तासांत इराणकडून इस्त्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो, असे वृत्त अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्याच्या एका विशेष रिपोर्टमध्ये दिले आहे. या आधी इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. सिरीयातील इराणी दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या सुरक्षा रक्षक आणि अधिकारी मारले गेले. हा हल्ला इस्त्रायलने केला होता. त्याचा बदल आता इराण घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.
इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार
इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इराणने दिलेल्या हल्ल्याच्या धमकीनंतर इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, जो कोणी आमच्या देशावर हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. दरम्यान, इराणने दिलेल्या धमकीनंतर आता इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.