जेरुसलेम : हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांच्या सुटकेबाबतच्या करारावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. त्यानंतर इस्रायल मंत्रिमंडळाने शनिवारी गाझातील युद्धबंदीच्या कराराला मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर कायमचा तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या. युद्धबंदीची अंमलबजावणी २४ तासांच्या आत म्हणजे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून झाली असल्याची माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली.
इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदीच्या कराराची घोषणा बुधवारी अमेरिका व कतारने केली होती. त्यानंतर जगभरातून याचे स्वागत झाले. मात्र, हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांच्या सुटकेबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी स्पष्ट केल्यानंतर नवा पेच निर्माण झाला होता. शनिवारी इस्रायल मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे हा पेच सुटला.
दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १,२०० नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यानंतर हमासने २५० नागरिकांचे अपहरण केले होते. यापैकी एक तृतीयांश नागरिक जिवंत नसल्याची भीती इस्रायलने व्यक्त केली आहे. त्यामुळे ओलिसांच्या सुटकेबद्दल हमास व इस्रायलमध्ये एकमत झाले असले तरी पहिल्या टप्प्यात कोणत्या ३३ ओलिसांची सुटका केली जाईल, याबद्दल स्पष्टता नाही. या कराराअंतर्गत इस्रायल सरकार देखील शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे.
७०० पॅलेस्टिनींना सोडणार
इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात सुटका करण्यात येणा-या ७०० पॅलेस्टिनी नागरिकांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेनंतर त्यांच्या सुटकेला सुरुवात होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅलेस्टिनी कैद्यांमध्ये तरुण व महिलांचा समावेश आहे. हमासने ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर हल्ले सुरू केल्यानंतर १५ महिने युद्ध सुरू होते. या युद्धात ४६ हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.