लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा ईद-ए-मिलादून्नबी कमिटीच्या वतीने धार्मिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांनी दि. १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांत ८०० पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान केले तर ११२२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी भव्य जुलूस काढण्यात आला होता.
श्री गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने ईद-ए-मिलादुन्नबीचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. त्यानूसार दि. १९ सप्टेंबर रोजी शहरातून भव्य कौमी एकता दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. ईद-ए-मिलादून्नबी उत्सवादरम्यान विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये ८०० पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान केले. महाआरोग्य शिबीर व हिजामा शिबिरात ११२२ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सुमारे ६० क्विंटल अन्नदान करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी जुलूस काढण्यात आला. शहरातील न्यु. काजी मोहल्ला येथील सोफिया मस्जिद येथून जुलूस निघाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, भूसार लाईन, सूभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान, तेलीगल्ली, पटेल चौक मार्गे हजरत सुरत शाहवली दर्गा येथे जुलूस पोहोचल्यानंतर येथे धार्मिक प्रवचन व अन्नदानाने जुलूसची सांगता झाली.
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष महेबुब काजी, उपाध्यक्ष नुरअली, आवजे कुरेशी, युनूस शेख, सरफराज पठाण, सलीम रजा कुरेशी, सफराज मणियार, फकीर मिस्त्री, यासीन कच्छी, मुस्तफा शेख, मुस्तफा घंटे, नसीर शेख, रहेमतुल्ला मिस्त्री, मुर्तुूजा शेख यांच्यासह लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे संस्थापक सचिव उमरदराज खान यांनी सहकार्य केले.