22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसोलापूरईव्हीएममधील फेरफार पुराव्यानिशी सिद्ध करू : उत्तम जानकरांचा इशारा

ईव्हीएममधील फेरफार पुराव्यानिशी सिद्ध करू : उत्तम जानकरांचा इशारा

सोलापूर : ईव्हीएमवर झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत मारकडवाडीत आज मंगळवारी (ता. ०३ डिसेंबर) फेरनिवडणूक घेण्यात येणार होती. परंतु, प्रशासनाच्या दबावानंतर ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वात मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पोलिस प्रशासनाकडून हे मतदान वजा आंदोलन हाणून पाडण्यात आले आहे. ज्यामुळे आमदार जानकरांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

ईव्हीएमबाबत आरोप करत आमदार उत्तम जानकर म्हणाले की, मतदान प्रक्रियेत प्रशासन आणि पोलिसांनी खोडा घातला आहे. लोकशाही मार्गाने गावकरी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत होते. मंडपात मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. त्यांना मतदानाचा हक्क बजावायचा होता. पण पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने अनेक गावकरी मंडपातून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. वयोवृद्ध आणि महिला मंडप सोडून गेले, असे जानकरांकडून सांगण्यात आले. तसेच, ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपाकडे वळत असल्याचा दावाही उत्तम जानकर यांनी केला.

भाजपाला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते होत असल्याचा गंभीर आरोप जानकरांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडीत घडलेल्या सर्व प्रकारावरून आता प्रशासनाला इशारा दिला आहे. ईव्हीएममध्ये झालेला घोळ हा आपण पुराव्यानिशी सिद्ध करू. येत्या १५ दिवसांमध्ये १०० टक्के हा घोळ सिद्ध करण्यात येईल, असा इशाराच जानकरांकडून देण्यात आला आहे. तर, माझ्या अभ्यासानुसार मला या गावात १४०० आणि समोरच्याला ५०२ इतकी मतं पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकडवाडीतून १००३ मतं पडल्याचे समोर आले. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले, असा आरोपही जानकर यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR