मुंबई : राज ठाकरे यांनी मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठीच चालणार, नाही तर कानाखाली आवाज येईल, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते विविध आस्थापनांमध्ये जात तिथल्या अधिका-यांना कार्यालयीन कामात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत निवेदने दिली जात आहेत. अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. मात्र यावेळी मंत्री उदय सामंत यांनी उबाठा नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून सहा नेते वेटिंगवर असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. अशातच मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेले राजकारण, त्यावर पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी केलेली टीका लक्षात घेता मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेत आहे.
मुंबईत मराठी बोलण्यास परप्रांतीयांनी नकार देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या विरोधात आता मनसेने आंदोलन पुकारले आहे. सध्या मनसेचे पदाधिकारी विविध बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जात असून, तिथल्या अधिका-यांना कार्यालयात कर्मचा-यांनी मराठीत बोलावे अशी सक्ती करण्याचे निवेदन दिले जात आहे. याप्रकरणी बँकिंग असोसिएशनने थेट मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी थेट मराठी भाषा विभागाच्या मंत्र्यांनाच आपल्या घरी बोलवल्याचे आता समोर आले आहे.
मी मराठी भाषा विभागाचा मंत्री
याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून राज ठाकरेंनी मला आज बोलावले होते. त्याची कल्पना मी एकनाथ शिंदे यांना देऊन आलो आहे. महाराष्ट्रात ज्या काही बँका आहेत, ज्या काही संस्था आहेत, तिथे मराठीच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला जातो, किंवा तिथे मराठीच्या बाबतीत जे काही घडत आहे, त्याला निर्बंध कसे घालायचे? यावर उपाय काय? याबाबत चर्चा करण्यासाठी मला बोलवले होते.