अंबाजोगाई : प्रतिनिधी
येथील प्रसिध्द लेखक उमेश मोहिते यांच्या ‘खोडा ’या कथासंग्रहास आणि आष्टी तालुक्यातील बीड सांगवीचे तरुण लेखक लक्ष्मण दिवटे यांच्या ‘उसवण ’ या ग्रामीण कथासंग्रहास चंद्रपूर येथील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा शब्दांगण राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासाहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या वार्षिक पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी नुकतीच केली आहे.
उमेश मोहिते यांचे ‘खोडा ’ हे दहावे पुस्तक असून या कथासंग्रहाचा हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.श्री.मोहिते यांनी या कथा संग्रहामधून कष्टकरी शेतकरी वर्गाची सुख-दु:खे जिवंतपणे रेखाटली आहेत तर व्यवसायाने बीड जि.प.च्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष् मण दिवटे यांचे ‘उसवण’ हे पहिलेच पुस्तक असून त्यामधून त्यांनी आजच्या गाव- खेड्याचे चित्रण समर्थपणे केलेले आहे.
या पुस्तकाला मिळालेला हा सातवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. चंद्रपूरच्या या शब्दांगण साहित्य पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून या पुरस्काराचे वितरण पुढील महिण्यात चंद्रपूर येथे होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.या पुरस्काराचा एक विशेष म्हणजे कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार प्राप्त हे दोन्ही लेखक बीड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत.या यशाबद्दल दोन्ही लेखकांचे लेखक-मित्र आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.