जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या २ कोटी ७० लाखांच्या चोरीप्रकरणी या गुन्ह्यातील तीन चोरट्यांना पोलिसांनी कारसह अटक केली. सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने या चोरट्यांना पकडले आहे.
शहरातील आरबी अँड सन्सच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरट्यांनी १७ लाख रुपये, दीड किलो सोनं आणि २ क्विंटल चांदीची भांडी लंपास केली. पोलीस तपासानंतर ही चोरी यूपीच्या बॅटरी गँगने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मास्क घातलेल्या लोकांना पकडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि एआयने फोटो मिळवून या गँगला पकडले. आरोपी भागीरथ, यादराम हे उत्तर प्रदेशचे आहेत, तर अजय सिंह झोटवाडा येथील रहिवासी आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
चुरूचे एसपी जय यादव म्हणाले की, याच गँगने बंगालमध्येही ४ किलो सोने चोरले होते. छगनलाल यांनी १ डिसेंबर रोजी रतनगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात गुंतलेल्या ३० पोलीस कर्मचा-यांनी सुमारे १००० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर फुटेजमध्ये एक संशयास्पद वाहन दिसलं. या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.