24 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रएकीसाठी दोन पावलं मागे : शरद पवार

एकीसाठी दोन पावलं मागे : शरद पवार

पुणे : प्रतिनिधी
पक्षाला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी दोन पावलं मागे आलो. आपण एकत्रित राहिलो म्हणूनच यश मिळाले. आतापासूनच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या कामाला लागावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे बोलताना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची येथे बैठक झाली. बैठकीत नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

बैठकीला शरद पवार गटातील राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे. पवार यांचा यशाचा आलेख महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे. शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक २१ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.काँग्रेसकडून १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यात काँग्रेसला १३ शिवसेनेला ९ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा पैकी ८ जागांवर विजय मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना नेते पवार म्हणाले की, आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी दोन पावलं मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा. राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा. लोकांची जास्तीत जास्त कामे करा. लोकांचा फारसा संबंध दिल्लीत येत नाही. राज्यात प्रश्न महत्त्वाचे असतात. त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा, असे पवार यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR