23.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeसोलापूरएकेरी पद्धतीचे टेंडर रद्द करा; सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचा मोर्चा

एकेरी पद्धतीचे टेंडर रद्द करा; सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचा मोर्चा

सोलापूर :
यावर्षांचे जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाचे टेंडर एकेरी पद्धतीने काढले आहे. १३२ कोटींचे टेंडर रद्द करुन पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणीसाठी सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ व कामगार संघटनेने एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

क्षत्रिय गल्ली येथून निघालेला मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. ‘हाताला काम द्या, मशिन चालवा’ या घोषणा देत गारमेंट उद्योजक आणि कामगारवर्ग या मोर्चात सहभागी झाले होते. एकेरी टेंडर पद्धत रद्द करावी, अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली. दरवर्षी प्रत्येक शाळेच्या शालेय समितीला व मुख्याध्यापकांना अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते.

या टेंडर पद्धतीने विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही. याचा अनुभवदेखील मागच्या टेंडरच्या वेळी आला आहे. त्यामुळे शासनाने ही पद्धत रद्द करून जुन्या पध्दतीने गणवेशाचे काम द्यावे, अशी मागणी गारमेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी केली. या टेंडर पद्धतीमुळे विद्याथ्यांचे नुकसान होते. याशिवाय एकेरी टेंडर पद्धतीमुळे सोलापूर शहर- जिल्ह्यातील सर्व रेडिमेड कापड उत्पादक, उद्योजक आणि कामगारांना काम मिळणार नाही.

या आंदोलनात सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश शहा, प्रकाश पवार, सतीश पवार, सुनील मेंगजी, अशोक चव्हाण, विनायक माळगे, सुरेश बिद्री, अमित जैन उपस्थित होते.दरम्यान, यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मागील तीन महिन्यांपासून एकही काम मिळालेले नाही. सात ते आठ हजार कामगार बेरोजगार होतील, अशी भीती गारमेंट उद्योजक अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR