लातूर : प्रतिनिधी
चीनमध्ये कोरोनाप्रमाणेच प्रसार होणा-या एचएमपीव्ही ( ुमन मेटान्यूमोव्हायरस) विषाणुमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही या विषाणुने प्रवेश केला आहे. या विषाणुने प्रभावित झालेले दोन रुग्ण नागपुरात आढळून आल्याने आणखी काळजी वाढली. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून दि. ७ जानेवारी रोजी राज्याचे आरोग्यमंत्री, सचिव, आयुक्त यांच्यासोबत व्हीसी झाली. आरोग्य खात्याकडून विविध सूचना देण्यात आल्या असून त्यानूसार यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी दिली.
या संदर्भाने अधिक माहिती देताना डॉ. उदय मोहिते म्हणाले, एचएमपीव्ही हा विषाणू शंभर वर्षांपासूनचा जुना विषाणु आहे. त्यामुळे त्याबाबत फार काळजी करण्याची आवश्यकता नसली तरी सतर्क राहाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन व औषधांचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनूसार रुग्णालयातील वर्ग-१ आणि वर्ग-४ च्या कर्मचा-यांच्या सुट्या बंद करण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.