22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयएनडीएला धक्का

एनडीएला धक्का

पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीची घोडदौड, १३ पैकी १० जागांवर विजय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील १३ विधानसभा जागांवर १० जुलै रोजी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा धक्का बसला असून इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारत ७ राज्यांतील १३ पैकी १० जागांवर विजय मिळविला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाने ४ आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने ४ जागांवर विजय मिळविला. मात्र, भाजपला केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले. यात बिहारमधील एक जागा अपक्षाने जिंकली.

पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत या पोटनिवडणुक झाल्या. आमदारांच्या निधनामुळे किंवा आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त १३ जागांवर ही निवडणूक झाली. यामध्ये बिहारमधील रुपौली, रायगंज, राणाघाट दक्षिण, पश्चिम बंगालमधील बागडा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागड यांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असलेल्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

चमोली बद्रीनाथ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे लखपत बुटोला विजयी झाले. बुटोला हे नवखे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध कॉंग्रेस सोडून गेलेले माजी आमदार भंडारी मैदानात होते. त्यांचा पराभव झाला. मंगळूरमध्येही काँग्रेसचे काझी निजामुद्दीन यांनी भाजपच्या करतारसिंह भडाना यांचा पराभव केला. तसेच हिमाचल प्रदेशात काँग्रेस उमेदवार आणि मुख्यमंत्री सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला. याशिवाय टीएमसीने पश्चिम बंगालमधील चारही जागा जिंकल्या असून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, पंजाबमधील जालंधर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मोहिंदर भगत विजयी झाले. बिहारमधील रुपौला मतदारसंघात जदयू, राजदला धक्का देत अपक्ष शंकर सिंह यांनी विजय मिळविला.

भाजप आगामी सर्व
निवडणुका हरेल
लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला हा ट्रेंड पुढे सरकत असल्याचा दावा काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला. अशा परिस्थितीत भाजप आगामी सर्व निवडणुका हरत राहील. कारण लोकसभेनंतर पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीनेच बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत अयोध्ये आणि आता बद्रीनाथमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला.

भाजपचे भय अन्
भ्रमाचे जाळे तुटले
७ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने आता भाजपने विणलेले भय आणि भ्रमाचे जाळे तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हुकुमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याची शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी आणि कर्मचा-यांसह प्रत्येक वर्गाची इच्छा आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR